Friday, 19 November 2021

संगीतकार प्यारेलाल, प्रेम चोप्रा, नाना पाटेकर, संजय राऊत, माला सिन्हा यांना प्रतिष्ठित मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार सन्मान

  


 

मुंबई- संगीतकार प्यारेलाल, प्रेम चोप्रा, नाना पाटेकर, संजय राऊत, मीना मंगेशकर खडीकर यांना यंदाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली.  बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१ रोजी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे प्रतिष्ठित दीनानाथ पुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांनी संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार करण्यात येणार आहेत.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असून त्त्यांच्या  हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

या वर्षी, संगीत आणि कलेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार (जीवन गौरव पुरस्कार) दिग्गज संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना त्यांच्या भारतीय संगीत आणि सिने उद्योगातील समर्पित सेवेसाठी घोषित करण्यात आला आहे. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी दीनानाथ पुरस्कार तर दीनानाथविशेष पुरस्कारज्येष्ठ गायिका-संगीतकार मीना मंगेशकर-खडीकर यांना देण्यात येणार आहे. प्रख्यात अभिनेते प्रेम चोप्रा यांनाही चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या समर्पित सेवेबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनाही रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील आयुष्यभराच्या सेवेबद्दल  मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. खासदार-राज्यसभा आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनाही पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

चित्रपट क्षेत्रातील समर्पित सेवेबद्दल माला सिन्हा यांनाही विशेष पुरस्कार देण्यात येणार असून साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा वागविलासिनी पुरस्कार संतोष आनंद यांना घोषित करण्यात आला आहे.  कवयित्री नीरजा यांना  कविता आणि साहित्यातील योगदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे. याशिवाय डॉ. प्रतीत समदानी, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबोळकर, डॉ. अश्विन मेहता, डॉ. निशित शहा आणि डॉ समीर जोग यांचा औषध आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील समर्पित सेवेबद्दल विशेष पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

पुरस्कारांची घोषणा बरताना हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी सांगितले, “गायक, संगीतकार आणि नाट्य अभिनेते म्हणून मास्टर दीनानाथजी यांचे महाराष्ट्र आणि देशभरातील कलाप्रेमींसाठी अतुलनीय आणि प्रेरणादायी योगदान आहे. त्यांच्या स्मरणार्थ, मंगेशकर कुटुंब दिग्गजांना सन्मानित करण्यासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार घोषित केले जातात.  गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला जनतेचे प्रेम आणि पाठिंबा मिळत आहें आणि याचा आम्हाला खूप आनंद आहे.”

दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानची मंगेशकर कुटुंबाने ३१ वर्षांपूर्वी स्थापना केलेली असून या संस्थेची नोंदणी पुणे येथील सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टमध्ये करण्यात आलेली आहे. दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार सोहळा दरवर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी म्हणजे  24 एप्रिल रोजी आयोजित केला जातों. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोना साथीमुळे हा पुरस्कार सोहळा आयोजित करणे शक्य झाले नव्हते. मात्र यंदा हा पुरस्कार सोहळा २४ नोव्हेंबर २०२१ रोज़ी आयोजित करण्याचा निर्णय मंगेशकर कुटुंबीयांनी घेतलेला आहे. या पुरस्कार सोहळ्यात हृदयेश आर्ट्स तर्फे आयोजित डॉ. राहुल देशपांडे यांच्या सुमधूर गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

No comments:

Post a Comment